News

जेजे पेक्षा ‘साबळे’ मोठे ?

‘चिन्ह आर्ट न्यूज’मधून ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ संदर्भात जे अतिशय टीका करणारं लिखाण प्रसिद्ध होत आहे ते वाचून अनेकांना प्रश्न पडतो आहे की, ज्यांच्यावर हे लिखाण प्रसिद्ध होत आहे त्यांचा आणि ‘चिन्ह’चा काही छत्तीसचा आकडा वगैरे आहे का ? तर नाही. तसं काहीही नाही. किंबहुना ज्यांच्यावर ‘चिन्ह टीका करतो आहे त्यांच्याशी साधा परिचय देखील नाही. फार तर तोंडओळख असेल किंवा कधी प्रदर्शनात अथवा जेजेमध्ये दुरुन पाहिलं असेल वगैरे. अन्यथा तसा योग कधी आलाच नाही.

‘चिन्ह’ त्यांच्यावर टीका करतो कारण ते ‘चिन्ह’ला टीका करायला वाव देतात म्हणून. अनेकदा ती टीका ‘हाय होल्टेज’ असते यात वादच नाही. पण त्यालाही तेच कारणीभूत आहेत. एवढी टीका केल्यावर त्यांच्यात कोणताही बदल होतांना दिसत नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे. कदाचित आम्ही जी टीका करतोय ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसावी किंवा आमच्या टीकेला ते भीक घालत नसावेत. एवढाच त्याचा मतितार्थ असावा.

अगदी आजचं उदाहरण पाहा आज जेजेत यंदा जी अभ्यास सहल गेली होती तिच्या प्रदर्शनास सुरुवात झाली. सकाळी १०.०० वाजता प्रदर्शनाचं उदघाटन देखील झालं. आणि प्रदर्शनाला उदघाटन करण्यासाठी कोण प्रमुख पाहुणे लाभले होते ठाऊक आहे ? प्राध्यापक विश्वनाथ साबळे जे सध्या जेजेचे अधिष्ठाता पद भूषवत आहेत, तेच चक्क प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे किंवा ‘चीफ गेस्ट’ म्हणून प्रदर्शनाचे उदघाटन करते झाले. सांगतोय त्यावर विश्वास बसत नाही ना ! मग प्रदर्शनाचं पोस्टरच पाहा. आता तरी विश्वास बसला ? यावर हसावं का रडावं हे देखील कळेनासं झालंय.

ज्या कला महाविद्यालयामध्ये आपण अधिष्ठाता म्हणून नोकरी करतोय, आपल्या अधिष्ठाता पदावर कधी नव्हे इतकी प्रचंड टीका होते आहे अशा वेळी हे गृहस्थ स्वतःच्याच कला महाविद्यालयात ‘प्रमुख पाहुणे’ (चीफ गेस्ट ) म्हणून उपस्थित राहतायत. इतकंच नव्हे तर ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ चा लोगो वापरलेल्या पोस्टरवर चीफ गेस्ट म्हणून स्वतःचा उल्लेख करण्यात धन्यता मानत आहेत. सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे ज्या कोणी  डिझाइनरने (?) या पोस्टरचं डिझाईन केलंय त्याने बहुदा आपला मेंदू गहाण ठेवला असावा कारण विश्वनाथ साबळे यांच्या नावासाठी वापरलेला टाईप हा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या टाईपापेक्षा मोठा आहे. लाज आणि शरम ही गोष्ट विकून खाल्ली की हे असले चाळे सुचतात, या आमच्या मताशी आपण नक्कीच सहमत व्हाल याची आम्हाला खात्री आहे.

*****

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.