News

जयदीप आपटेचं शिल्प ऑस्ट्रेलियात…  

रहेजा स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी जयदीप आपटे यांनी तयार केलेलं शीख सैनिकाचं शिल्प ऑस्ट्रेलियाच्या ग्लेनवूड पार्क, सिडनी येथे उभारण्यात आलं आहे. पहिल्या दुसऱ्या महायुद्धात जे शीख सैनिक लढले होते त्यांची आठवण म्हणून हे शिल्प स्थापित केले आहे. शीख समुदायासाठी काम करणाऱ्या फतेह फौंडेशन तर्फे या शिल्पाची स्थापना करण्यात आली.

हे शिल्प ६.५ फुटाचे असून ब्रॉन्झ धातूमध्ये घडवण्यात आले आहे. २०१९ मध्ये एक शीख सैनिकाचा ब्रॉंझचा सहा फुटाचा पुतळा लंडनला स्थापित करण्यात आला.  ते शिल्प जयदीप आपटे यांनी केलं होतं. हे काम बघून सिडनीच्या संस्थेने जयदीप यांना सदर काम देण्याची इच्छा व्यक्त केली. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात जयदीप यांनी या कामाला सुरुवात केली. शिल्पाचे काम करताना कुठले संदर्भ वापरले याबाबत आपटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “आधी एक अशाच प्रकारचे शिल्प तयार केले असल्यामुळे त्या वेळचे संदर्भ माझ्याकडे होते पण हे शिल्प शस्त्रधारी दाखवायचे असल्याने मला वेगळा अभ्यास करावा लागला, म्हणजे त्या वेळी एनफिल्ड बंदूक वापरली जायची पण त्या बंदुकीचे ३ ते ४ प्रकार होते. त्यामुळे पूर्व भागात ज्या प्रकारची एनफिल्ड वापरली जायची ती या शिल्पासाठी संदर्भ म्हणून वापरली. त्याशिवाय तलवारीचे , पाण्याच्या बाटलीचे, पाठीवरच्या बॅगेचे असे सगळे संदर्भ शोधून ते इथे वापरावे लागले.

या शिल्पाचे काम करण्याच्या प्रोसेसबद्दल विचारले असता जयदीप आपटे यांनी सांगितले की, “कामाची सुरुवात पेन्सिल स्केचेसपासून केली, नंतर काही मातीची थ्रीडी स्केच मॉडेल्स करून त्यातून दोन निवडून ती लहान मापात तयार केली, जी मोठ्या शिल्पाच्या सहापट लहान होती. त्यातून एक मॉडेल निवडले. त्यातले काही बारकावे बदलून जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या शिल्पाच्या मातीकामाला सुरवात केली. साधारण फेब्रुवारीच्या शेवटी शिल्पाची फायबर मधली कॉपी तयार होऊन ती पुढे ब्रॉंझ कास्टिंग साठी पाठवली. ब्रॉंझ कास्टिंग होऊन पुतळा मे अखेरीस तयार झाला. साधारण ४३० किलो वजनाचा ६.५ फुटाचं ब्रॉंझचं शिल्प तयार झालं. या वेळी हातातली बंदूक आणि तलवार यांच्यामुळे शिल्पाचा बॉक्स मात्र खूप मोठ्या आकाराचा झाला. ३० मे २०२२ ला शिल्प भारतातून रवाना झालं. शिल्प समुद्रमार्गे जाणार असल्यानं तो वेळ जवळपास ४५ दिवसांचा होता. शेवटी १४ जुलैला शिल्प फतेह फौंडेशनककडे पोहोचलं.  २६ मार्च २०२३ ला त्याचं उदघाटन झालं.”

जयदीप यांना आधीचे काम आणि आलेल्या समस्या याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, “हे काम किंवा आधीच्या कामाविषयी, खासकरून परदेशात पाठवायच्या कामांविषयी सांगायचं झालं तर आपल्याकडच्या कलेच्या शिक्षणातले काही अभाव प्रकर्षाने जाणवले. आपल्याकडे अभ्यासक्रमात व्यावहारिक गोष्टींचा समावेश करणं प्रचंड आवश्यक आहे असं वाटलं. कारण कलाकार म्हणून काम करून मोकळे झालो यावर या गोष्टी न थांबता त्याच्या बाकीच्या प्रक्रियांची जाणीव करून देणे हे खूप गरजेचं आहे, कलाकार म्हणून आपलं काम बोललं पाहिजे हे जरी खरं असलं तरी ते काम नक्की होईपर्यंत कलाकारालाच बोलावं लागतं अशा वेळी भाषेचा अडसर निर्माण झाला तर त्यावरही मात करणं गरजेचं असतं. त्याशिवाय काळ बदलतोय तसं  तंत्रज्ञान विकसित होत आहे त्यानुसार आपण आपल्या कलेमध्ये तसे बदल करून घेणं आवश्यक आहे. त्याचीही जाणीव कलाकाराला असणं गरजेचं आहे. या पुतळ्याच्या कामात पहिल्यांदा मी पारंपरिक मातीकामाबरोबर थ्रीडी प्रिंटिंगचा वापर केला आहे. त्या वेळची बंदूक जी होती तीच डिजिटल मॉडेलिंग करून ती थ्रीडी प्रिंट करून घेतली होती. यामुळे वेळ वाचला शिवाय बंदुकीच्या कामातला नेमकेपणा जास्त सहजपणे आणता आला.”

जयदीप हे रहेजा स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत. तिथे त्यांनी अप्लाइड आर्टचे पदविकेचे शिक्षण घेतले. पुढे जेजे स्कूल ऑफ आर्ट इथून त्यांनी शिल्पकलेमध्ये पदविकेचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ते कल्याण येथे वास्तव्य करतात आणि तिथेच त्यांचा स्टुडिओ आहे.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.