News

जेजेवाल्यांची सभा ठाण्यात…


जेजे अनन्य अभिमत विद्यापीठा संदर्भात चालवणाऱ्या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांची एक विशेष सभा काल ठाण्यात पार पडली. जेजेवर मनापासून प्रेम करणारे जेजेचे माजी विद्यार्थी काल या सभेसाठी लांबून लांबून ठाण्यात आले होते . कुणी सफाळ्यावरून, कुणी दहिसरवरून कुणी बोरवलीवरून तर कुणी कांदिवली वरून जेजेची एक माजी विद्यार्थिनी तर थेट कर्जत वरूनच सभेला उपस्थित राहण्यासाठी आली होती. ही सारीच मंडळी जेजेवरील प्रेमामुळेच एकत्र आली आहेत, त्यांना कुणी बोलवायला गेले नाही . आपण होऊनच ही सर्व मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आहेत, यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप हा सोशल मीडिया मदतीला आला. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या अशीच वाढत जाणार असं दिसत आहे. या सर्वांनाच जेजे विषयी कळकळ आहे. जेजेच काहीतरी चांगलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटीच ही मंडळी एकत्र आली आहेत.

या सभेत हे आंदोलन कसे पुढे घेऊन जायचं यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. नवीन आलेल्या मंडळींनी अनेक प्रश्न उपस्थित केले पण या सर्व प्रश्नांची उत्तर जुन्या मंडळींकडे होतीच, त्यामुळेच सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दहा पंधरा दिवसातच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. तत्पूर्वी काय काय कामं करावी, कोणती कामं प्राधान्यानं हाती घ्यावी या संदर्भातच प्रामुख्यानं या सभेत चर्चा झाली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाज माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. माध्यमामार्फतच जेजेच्या १९७० सालापासूनच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं जाणार आहे. व्हाट्सअप ग्रुप मार्फतच त्यांच्या पर्यंत आंदोलनाच्या घडामोडी पोहोचवल्या जाणार आहेत.


या आंदोलनाचे सूत्रधार आशुतोष आपटे समवेत या सभेला सर्वश्री सुनील नाईक, झकीर मिर्झा, गुरुनाथ भडेकर, मंगेश चोरगे, यतींद्र प्रधान, प्रदीप चौधरी, आर्किटेक्ट प्रभू ,स्मिता गीध, मोरेश्वर पाटील आणि ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक हे उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 7