News

डी-नोव्हो आणि मुख्यमंत्री !

‘चिन्ह आर्ट न्यूज’नं सुरु झाल्यापासून जेजेला मिळणाऱ्या डी-नोव्हो दर्जाविषयी विविध लेख प्रकाशित करून डी-नोव्होविषयीची सर्वच माहिती लोकांसमोर आणली होती. खरं तर डी-नोव्होची चळवळ सुरु करणाऱ्यांतर्फे यासंदर्भात आजच जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एक गेट-टुगेदरचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता, पण एकूणच अस्थिर राजकीय स्थितीमुळे आयत्यावेळी तो रद्द केला. यानिमित्तानं ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ती इथं शेयर करीत आहोत.

“शनिवारी किंवा रविवारी माजी शिक्षणमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पाहूनच असा प्रश्न पडला की, ‘हे गृहस्थ अजून नॉट रिचेबल झाले नाहीत कसे ?’ या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दिवशीच त्यांना गुवाहाटी विमानतळावर बघूनच मिळालं. त्यांच्या स्वप्नातलं राज्यस्तरीय कला विद्यापीठ आता बहुदा बारगळल्यातच जमा आहे आणि त्यांनी ज्या ज्या अनुदानित आणि विना अनुदानित कला महाविद्यालयांच्या शिक्षक आणि संचालकांना आशा लावून ठेवल्या होत्या त्याही आता मातीमोल झाल्यात जमा आहेत. कारण डी-नोव्होला विरोध करणाऱ्या ज्या ज्या मोहिमा समाज माध्यमांवर कार्यरत होत्या त्या साऱ्याच आता बारगळलेल्या दिसत आहेत. लाईव्ह कार्यक्रमांच्या घोषणा देखील बंद झाल्या आहेत. त्यातल्या त्यात सांगलीकर मात्र तेच तेच घीसेपीटे प्रश्न विचारून त्यात जोम आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते काही खरं नाही.

राज्यस्तरीय विद्यापीठासाठी जी डॉ. विलास खोले समिती स्थापन झाली होती त्यातल्या एका सदस्याला या संदर्भात विचारलं असता त्यांनी चक्क खांदे उडवले. अगदीच खोदून विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं की, ‘आम्ही सरकारला आमचा अहवाल देणार आहोत. मंत्री तिथं आहेत किंवा नाहीत याच्याशी आमचा काहीही संबंध नाही’, पण तिथंच तर खरी गोम आहे. ज्या राज्यशासनाला गेल्या ४० वर्षात साधं कला संचालनालय धडपणे चालवता आलं नाही, ते राज्यशासन स्वतंत्र कला विद्यापीठाचं घोंगडं गळ्यात बांधून घेईल का ? अगदी साधा प्रश्न आहे. असो.

या साऱ्या भानगडीत जे जे स्कूल ऑफ आर्टला जो सहजगत्या डी-नोव्हो दर्जा मिळणार होता त्याचीही आता फरफट झाली आहे. असं म्हणतात की हे लिहीत असताना शिक्षण सचिवांकडून सदर फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधले आपले जुने दिवस आठवून त्यावर जर सही केली तरच जेजेच्या डी-नोव्होचं काम मार्गी लागेल आणि संबंधितांना पुढील चाल मिळून येत्या जानेवारीपासून देखील पहिलं सत्र सुरु करता येऊ शकेल. पण हे सारं मुख्यमंत्र्यांच्या सहीवर अवलंबून आहे. अन्यथा नवीन मुख्यमंत्र्यांकडेच ही फाईल जाईल आणि नंतर त्यावर काय होईल ? तिचा कधी निर्णय लागेल ? हे आत्ता तरी सांगणं अवघड आहे. असो, आहे हे असं आहे ! या निमित्तानं एक मात्र बरं झालं, जेजेचे सर्वच्या सर्व माजी विद्यार्थी एका झेंड्याखाली आले आहेत आणि त्यांनी डी-नोव्हो दर्जा मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करायचंच असा निर्णय घेतला आहे. पाहूया पुढं काय होतं ते.”

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.