News

दीड दोन कॉलमचा फिलर होतो तेव्हा

काल भागवत बाई गेल्या . भागवतबाई म्हणजे डॉ नलिनी भागवत . त्या आम्हाला जेजेमध्ये कलेचा इतिहास शिकवायला होत्या .दुपारी व्हाटसअप वर अनेक मित्रांनी बातमी कळवल्यावर chinha art news साठी बातमी किंवा लेख द्यायचा म्हणून फोटो शोधू लागलो तर ते नेमके मिळेचनात . दिल्लीला त्रिएनाले प्रदर्शन पाहायला आम्ही मुलं मुलं गेलो होतो तेव्हा श्रीकांत जाधव आणि भागवत बाई देखील आमच्या सोबत होत्या . पण ते फोटो काही सापडेनात . अखेरीस नाद सोडला पण त्या शोधाशोधीत एक छान फोटो मात्र हाती आला तो सोबत दिला आहे .

मुलुंडच्या मुलुंड सेवा संघात जेजेतले आमचे आणखी एक सर प्रा सुधाकर लवाटे यांनी बहुदा १९९३ -९४ साली ‘ रूपबोध ‘ या शीर्षकाचं एक प्रदर्शन भरवलं होतं . सर्व सामान्य कला रसिकांपर्यन्त नवं चित्रकला जावी या हेतूनं . त्या प्रदर्शनात एके दिवशी चित्रकार प्रभाकर बरवे यांची मुलाखत होती . खूप छान झाली होती ती मुलाखत . गर्दी देखील खूप होती कार्यक्रमाच्या वेळी . बरवे देखील अतिशय भरभरून बोलले होते तेव्हा .

भागवत बाई तेव्हा लोकसत्तेत चित्रकलाविषयक सदर चालवत होत्या . त्यांनी त्या मुलाखतीचा एक छान वृत्तांत तयार करुन लोकसत्तावाल्याना दिला होता . मी त्यावेळी लोकप्रभात नोकरी करीत होतो . प्रेसमध्ये काही कामानिमित्तानं गेलो असताना . मला त्या वृत्तांताची ब्रोमाइड दिसली . त्यासोबत फोटोची देखील ब्रोमाइड होती . न राहवून मी तो वृत्तांत अधाशासारखा वाचून देखील टाकला .फोरमनना विचारलं , कधी येणार हो छापून ? तर ते म्हणाले , वृत्तसंपादकांनी सांगितलं तर लगेचच . आमच्याकडे काय तयार आहे , वगैरे . त्यावेळी मी मुलुंडला राहत असूनदेखील कार्यक्रमाला जाऊ शकलो नव्हतो कारण नेमका त्याच दिवशी मी मुंबईबाहेर गेलो होतो .आणि बरवे , लवाटे आणि भागवत सारेच जवळचे असल्याने तो वृत्तांत छापून येण्यात मला नक्कीच स्वारस्य होतं .

सात आठ दहा दिवस झाले . वृत्तांत काही आलाच नाही . आता तो काही येणार नाही असे वाटून मी त्याचा फ़ॉलोअप देखील सोडला . आणि एके दिवशी अचानक पेपरात बरवे यांचं नाव दिसलं म्हणून कुतूहलानं पाहिलं संपूर्ण दीड दोन कॉलमच्या त्या वृत्तांतामधल्या फक्त तीन चार ओळीच छापून आल्या होत्या . अतिशय वाईट वाटलं ते पाहून. रात्रपाळीच्या मुख्य उपसंपादकांकडे विचारणा केली तर त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की मला त्या मजकुरामधल्या जेव्हढ्या आवश्यक वाटल्या तेव्हढ्याच ओळी मी घेतल्या. त्यांचं ते उत्तर ऐकून मी अक्षरशः थिजून गेलो होतो. त्या नंतर दोनच वर्षात बरवे गेले .मग लवाटे सर देखील गेले. आणि आता काल भागवत बाई देखील गेल्या . पण घडलेला प्रकार मात्र डोक्यातून अद्याप गेलेला नाही, हेच खरं.

– सतीश नाईक
संपादक

******

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

या लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.