News

जहांगीरमध्ये ‘मिलेनिस्मल’ प्रदर्शन !

दत्ताराम नेरूरकर, अनुपमा डे, अश्वथी अविनाश, भास्करज्योती गोगोई, या कलाकारांचं ‘मिलेनिस्मल’ हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दि 30 मे ते 05 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलं आहे.

दत्ताराम नेरुरकर हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. त्यांना शिल्पकलेसाठी फ्रांस येथील शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. शिल्पांसाठी अनेक माध्यमात काम केल्यानंतर दत्ताराम यांना लाकूड आणि चिरा ( जांभा दगड ) हे सगळ्यात जवळचं माध्यम वाटलं. त्यांनी आपल्या शिल्पांमध्ये भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कृती आणि आधुनिकता यांची सांगड घातली. दत्ताराम यांच्या कलाकृती हजारो वर्षांपासून चिरंतन असलेल्या संस्कृतीच्या सौंदर्याला दृश्य स्वरूप देतात.

अनुपमा डे या पश्चिम बंगाल येथील छोट्या गावातून चित्रकलेच्या क्षेत्रात आलेल्या आहेत. छोट्या गावच्या पार्श्वभूमीमुळं त्यांना मानव आणि सरपटणारे दुर्लक्षित प्राणी यांच्यामधील अंतरसंबंधांचे चित्रण करण्यामध्ये रस आहे. अशा प्रकारच्या चित्रणातून त्या मानवाचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कॅनव्हासवर मांडतात. अनुपमा यांना प्रिंट मेकिंग या विषयात विशेष कौशल्य प्राप्त आहे. कोरोनानंतर त्यांना मास्कच्या चित्रांमध्ये रस निर्माण झाला. मास्कच्या वापरामुळे कोरोनाकाळात बरीच जीवितहानी टळली. त्यामुळे अनुपमा यांना या विषयामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली.

अश्वथी अविनाश या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी जेजेमधून सिरॅमिकचे शिक्षण पूर्ण केलं. अश्वथी अविनाश यांनी अनेक सिरॅमिक कलाकृती तयार केल्या आहेत. ज्यामध्ये टेबलवेअर, सिरॅमिक बटन यासारख्या वस्तूंचा समावेश होतो. सध्या अश्वती या सिरॅमिक आणि लाकूड यांच्या संगमातून कल्पक कलाकृती बनवत आहेत.

भास्करज्योती गोगोई हे गोहाटी, आसाम येथील चित्रकार आहेत. २०१८ मध्ये त्यांनी कला संगीत युनिव्हर्सिटी, खैरागढ येथून आपलं पदव्युत्तर कलाशिक्षण पूर्ण केलं. भोपाळ, नवी दिल्ली, पुणे, मुंबई येथील अनेक एकल आणि समूह प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. समृद्ध निसर्गानं संपन्न असलेल्या आसामचे रहिवासी असल्यानं तिथल्या निसर्गाचा प्रभाव भास्करज्योती यांच्या चित्रावर आहे. आसाममधील जनजीवन, मानव आणि निसर्ग यांचं परस्पर पूरक जीवन यांचं सुंदर चित्रण भासकरज्योती यांनी आपल्या चित्रांमध्ये केलं आहे.

हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत  खुले असेल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.