News

रझा आणि रवीशकुमार…

काल संध्याकाळी यु ट्यूब स्क्रोल करत असताना अचानक रवीशकुमार यांचा एक व्हिडिओ नजरेस पडला आणि थबकलोच. कारण त्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये रवीशकुमार यांच्या पार्श्वभूमीवर चित्रकार रझा यांचं एक पेंटिंग दिसतं होतं. रवीशकुमार यांच्या समोर होते प्रख्यात हिंदी कवी अशोक बाजपेयी.
त्याआधी सकाळी यु ट्यूब स्क्रोल करत असताना रवीशकुमार यांचा आणखीन एक व्हिडीओ नजरेस पडला होता. तो होता पॅरिस मधला. पॅरिसच्या रस्त्यांवरुन अगदी पहाटेच्या वेळी रवीशकुमार फिरत होते. आणि त्याच वेळी ते आपल्या चाहत्यांशी आणि प्रेक्षकांशी बोलत देखील होते. खूप छान निरीक्षण नोंदवत होते ते. पहाटेचं पॅरिस बघताना खूप गंमत वाटली. सुनील काळदातेची आठवण आली. पण आता तो पॅरिसमध्ये राहत नाही. वर्षा दोन वर्षापूर्वी तो पॅरिस सोडून पॅरिस पासून सुमारे ६०० किलोमीटर दूर इतक्या अंतरावर फ्रांस मधल्या एका छोटेखानी गावात राहू लागला आहे.
दोन तीन दिवसापासून ‘जन्मशताब्दी’ वर्षा निमित्ताने  पॅरिसमध्ये भरवल्या जाणाऱ्या रझा यांच्या प्रदर्शनाच्या बातम्या कानी येत होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट दिसत होत्या. त्यामुळेच रवीशकुमार या प्रदर्शनाच्या निमित्ताने पॅरिसमध्ये आले असणार हे लक्षात आलंच. रझा यांचं हिंदी भाषेवर असणार नितांत प्रेम यामुळेच रवीशकुमार यांना आमंत्रण केलं असणार असं काहीतरी मनात वाटून गेलं.
आणि अचानक स्क्रोल करताना दिसलेल्या त्या व्हिडीओमुळे ते वाटणं खरं ठरलं याचाही आनंद झाला. पॅरिसच्या पॉपेंदु सेंटरमध्ये हे प्रदर्शन भरलं आहे. रझा फौंडेशन हे त्याचे संयोजक आहेत. रवीशकुमार अतिशय सहजपणे आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधतात. सुमारे ४३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये रवीशकुमार प्रारंभीच कबुल करतात की ‘आपण कधीच कुठल्या प्रदर्शनाला गेलो नाही.’ आणि प्रेक्षकांना देखील ते आपल्या संवादात ओढून घेतात की ‘तुम्हीही कधी अशा प्रदर्शनाला गेला नसाल. आणि ही काही फारशी चांगली गोष्ट नाही’ असेही ते बोलून दाखवतात.
इतक्या प्रांजळपणे प्रास्ताविक केल्यावर तो व्हिडीओ कोण पाहणार नाही ? मी तर पाहिलाच कारण मी रविशचा सुरुवातीपासून चाहता आहे. एनडीटीव्ही सोडल्यापासून तर मी त्याला अधिकच फॉलो करु लागलो आहे. यु ट्यूबवरच्या त्याच्या ४.८ मिलियन सबक्राइबरपैकी मी एक असल्याने माझ्या टॅबवर लागलीच तो व्हिडीओ अवतरला होता.
तो व्हिडीओ प्रकाशित होऊन फक्त एक तास झाला होता आणि सुमारे ४३००० लोकांनी तो अवघ्या तासाभरात पहिला होता. दीड दोन हजार प्रेक्षकांनी त्याला लाईक केलं होतं. तर सुमारे तीनशे कंमेंट्स देखील आल्या होत्या. ( हे वाचल्यावर काही लोकांनां त्याचा नक्कीच त्रास होईल, पण त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही.) राजकारण, मोदी, भाजप, अडाणी, आरएसएस यापैकी एकाचाही उच्चार या व्हिडिओत झाला नसताना आता हा व्हिडीओ प्रसारित होऊन १९ तास झाल्यावर तो आतापर्यंत तब्बल २,९१,५६७ प्रेक्षकांनी तो पाहिलाय. जवळ जवळ २५००० प्रेक्षकांनी आतापर्यंत त्याला लाईक दिलाय आणि १००० प्रेक्षकांनी त्यावर कंमेंट्स केल्या आहेत. यावरून रवीशकुमार यांनी मिळवलेल्या अफाट लोकप्रियतेची कल्पना यावी.
मी याकडे वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहतो. एरवी या प्रदर्शनाला अशी प्रसिद्धी मिळाली असती का ? हे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरलंय हे तरी लोकांना कळलं असतं का ? या दोन्ही प्रश्नांची उत्तर नाही अशीच आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की आता आपल्याकडच्या वृत्तपत्र आणि वाहिन्यांची जी काही भयानक अवस्था झाली आहे ती पाहता कलावंतांनी आता आपल्या कलेच्या प्रसारासाठी अशा माध्यमांवर अवलंबून न राहता ‘यु ट्युब’र्स या नव्या संकल्पनेकडे अधिक लक्ष पुरवायला हवं. यातच त्यांचं आणि दृश्यकलेचं भलं आहे. यु ट्यूबवर Ravish Kumar Official या यु ट्यूब चॅनेलवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकाल. किंबहुना तो तुम्ही आवर्जून पहाच. दृश्यकलेच्या बाबतीत हा मोठा टर्निंग पॉईंट ठरावा असं मला मनापासून वाटतं.
*****

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.