News

जयंत जोगळेकर यांचं निधन !

टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागात तब्बल ३५ वर्ष चित्रकार म्हणून काम केलेले चित्रकार जयंत जोगळेकर यांचं गेल्या आठवड्यात बडोद्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडं असा परिवार आहे मुंबईतल्या चेंबूर मध्ये राहणारे जोगळेकर अलीकडेच बडोद्यामध्ये वास्तव्य करुन होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

७ मे १९३१ साली उत्तरप्रदेशात झाशी इथे त्यांचा जन्म झाला. ग्वाल्हेर इथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. १९५१ ते १९५५ या काळात त्यांनी जेजेमधून जीडी आर्ट केलं. आणि १९५६ पासून ते टाइम्स ऑफ आर्ट इंडियाच्या कला विभागात चित्रकार म्हणून नोकरीला लागले. टाइम्स ऑफ इंडियाच्या अनेक प्रकाशनासाठी त्यांनी काम केलं. स्क्रेपर बोर्डवरच त्यांचं काम विशेष नावाजलं गेलं होतं. प्रचंड वाचन आणि गोष्टी वेल्हाळ स्वभाव असल्यामुळं त्यांचा टाइम्समध्ये देखील मित्रपरिवार मोठा होता. बोलता बोलता अनेक मोठ्या संपादकांचे किस्से ते सांगत असत.
टाइम्सचे कला दिग्दर्शक संझगिरी, शंतनू माळी, कमल शेडगे, सत्यनारायण, नाना शिवलकर. मुकुंद तळवलकर,दत्तात्रेय पाडेकर यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी काम केलं. दामू केंकरे. मोहन वाघ. र कृ जोशी, यशवंत देव, दिनकर गांगल, कमलाकर नाडकर्णी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, श्रीनिवास खळे असा त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. ‘चिन्ह’चे तर ते चाहते होते. आधी अंक आणि नंतर वेबसाईटवरील लेखन ते नियमितपणे वाचायचे आणि आवर्जून प्रतिक्रिया द्यायचे. जुन्या आठवणी सांगायचे. दोन तीन वर्षांपूर्वी बडोद्याला शिफ्ट होताना त्यांनी आठवणीनं कळवलं होत. बडोद्यावरुनही ते वरचे वर फोन करीत असत. जुन्या आठवणी सांगत असत. काय नवं वाचलं ते कळवत असत. नव्वदीत देखील ते चित्रकला विषयक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेऊन होते. त्यांना ‘चिन्ह’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.