News

‘साधना’ आणि अमोल पालेकरांची ‘चित्र – साधना’!

‘चिन्ह’ जेव्हापासून ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागलं आहे तेव्हापासून आपण दरवर्षी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या चित्रकला विषयक लेखांची माहिती देत असतो. यंदाही तो प्रयत्न आम्ही नव्यानं करणार आहोत. प्रयत्न अशासाठी म्हणायचं कारण मराठीत प्रसिद्ध होणारे सारेच अंक काही मिळवून वाचता येणं शक्य नाही, पण जास्तीत जास्त अंक मिळवून त्यातील लेखांची माहिती ‘चिन्ह’ च्या वाचकांपर्यंत पोचवता येण्याचा तो प्रयत्न असतो. त्या अर्थानं तो प्रयत्न. या प्रयत्नात यंदा आम्ही ‘चिन्ह’च्या वाचकांनादेखील सहभागी करुन घेणार आहोत . तुमच्या वाचनात जर असा अंक आला की ज्यावर आम्ही लिहिलेलं नाही, तर त्या लेखाविषयी किंवा त्या अंकाविषयी आम्हाला कळवा  किंवा त्या लेखावरचा अभिप्राय आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तो तुमच्याच नावानं प्रसिद्ध करू.

 

 

हे टिपण लिहीत असताना मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन चालू आहे. पालेकर हे मुळचे चित्रकार आहेत. त्यांचं शिक्षण जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झालं आहे, ही गोष्ट कदाचित नव्या  पिढीला  ठाऊक नसण्याची शक्यता आहे. म्हणूनच पुण्याच्या साप्ताहिक ‘साधना’चा दिवाळी अंक हाती येताच त्यातला पालेकरांचा लेख वाचून  त्यावर आधी  लिहायचे निश्चित केले, जेणेकरुन पालेकरांची चित्रं पाहणं कलारसिकांना  सोयीचं होईल.

‘अवकाशाची दृश्यात्मकता’ या शीर्षकाच्या या सुमारे १००० -१२०० शब्दांच्या लेखात पालेकरांनी आपली चित्र रंगवण्यामागची भूमिका अगदी सुस्पष्टपणे मांडली आहे. त्यातील एक परिच्छेद जसाच्या तसा देण्याचा मोह टाळता येत नाही.

 

“…… वास्तविक पाहता, अमूर्तता आपल्या चारी बाजूंना अतिशय सढळ पद्धतीने वावरत असते. अभाळातल्या प्रकाशाच्या विलक्षण आविष्कारांना ओळखता येण्यासारखे विशिष्ट आकार नसतातच. गच्च पाऊस पडत असलेल्या एखाद्या संध्याकाळी ‘कुंद वाटणं’ म्हणजे नक्की काय असतं? ‘हुरहुर वाटते’, ‘कसंतरीच होतंय’, ‘मातीचा ओला वास’, ‘सुन्न झालो’, ‘ब्रह्मानंदी टाळी लागणं’, हे आणि असे अनेक नेहमीच्या वापरातले शब्दप्रयोग अमूर्तताच व्यक्त करतात. कोणतंही व्याकरण माहीत नसताना कानांवर पडलेल्या शास्त्रीय संगीतात खोलवर बुडून जाणं ही अमूर्तताच असते की. शब्दांच्या पल्याड जाऊन फक्त सुरांच्या आर्ततेने व्याकूळ होतोच ना आपण! मर्ढेकर, ग्रेस, खानोलकर, चित्रे, कोल्हटकर या आणि अशा कित्येक कवींच्या विलक्षण आनंद देणाऱ्या कविता कोणता मूर्त भाव आळवतात? “केव्हापासून धापापते हे आकाशाचे मौन दिगंबर” ही अनुभूती मूर्त शैलीत कशी दाखवत येईल? अलीकडचे कवी सोडा, ज्ञानेश्वर जेव्हा “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले” म्हणतात तेव्हा साक्षात अमूर्ताच्या पायीच तर नेऊन सोडतात आपल्याला. हे सगळं असलं तरी ‘नाहीच बुवा समजत आम्हाला अमूर्त शैली’, हा पूर्व ग्रह खोलवर रुजलेला आहे आणि तो खोडून काढायचे फारसे प्रयत्न समाज म्हणून आपल्याकडून होत नाहीत. ……”                  

मलाही चित्रकला क्षेत्रात प्रवेश केल्याला आता जवळजवळ ४१-४२ वर्ष पूर्ण होतील. या काळात चित्रकार, प्रसारक, कार्यकर्ता, लेखक, संपादक या नात्यानं मी फक्त आणि फक्त चित्रकला क्षेत्रातच काम केलं. पालेकरांसोबत काही काळ थिएटरमध्ये काम करण्याची संधी लाभल्यामुळे,  त्यावेळची त्यांची अतिशय प्रागतिक मतं, प्रगाढ  चिंतनशीलता,  विलक्षण संवेदनशीलता, आपल्याला जे म्हणायचं आहे ते कलाकृतीतून इतकंच नाही तर  शब्दातूनदेखील अतिशय प्रभावीपणे व्यक्त करण्याची त्यांची हातोटी हे सारं मी जवळून अनुभवलं होतं. आणि म्हणूनच परवाचं  त्यांचं प्रदर्शन  पाहिल्यावर मनात असे विचार आले की पालेकर नाटक, चित्रपटात अधिक रमले नसते तर, किंवा गेले नसते तर गायतोंडे, बरवे यांच्या नंतरची (मी मराठी – भारतीय वगैरे शब्दांचा प्रयोग करणं जाणीवपूर्वक टाळतो आहे) चित्रकला अधिक प्रगल्भ झाली असती. असो! पालेकरांचा ‘साधना’  मधला हा लेख मुळातूनच वाचावयास हवा. विशेषतः या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी  तर त्याची  पारायणं करावयास हवीत. एखादा खराखुरा कलावंत, प्रगल्भ कलावंत माध्यमांतर झाल्यावरदेखील आपले विचार मांडताना कशी आणि  किती संवेदनशीलता दाखवतो हे या लेखातून प्रकर्षानं जाणवतं. आणि हे वाचल्यावर जर कुणाला जहांगीर आर्ट गॅलरीला भेट द्यावीशी वाटली तर प्रदर्शन २० नोव्हेंबरपर्यंत चालू आहेच.

 

 

सतीश नाईक

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.