News

‘रंगा येई वो’ आणि मी !

काही दिवसापूर्वी शर्मिला फडके यांचा फोन आला . सह्याद्री वाहिनीच्या ‘ रंगा येई वो …’ साठी मी काही मुलाखती कराव्यात असा प्रस्ताव त्या कार्यक्रमाच्या निर्मात्याकडून आला आहे असं त्या सांगत होत्या . त्यावर मी त्यांचं अभिनंदन वगैरे केलं . तर त्या म्हणाल्या ‘ ते राहू दे ,पहिला कार्यक्रम तुझाच  रेकॉर्ड करायचा विचार आहे . तुझं काय मत आहे  ? मी म्हटलं , माझं काय मत असणार ? पण मी रुढार्थानं चित्रकार आहे असं चित्रकला वर्तुळातलं कुणी मानतील असं मला वाटत नाही . मी चरितार्थासाठी पत्रकारितेत काम केलं तेव्हा  चित्रकार मला पत्रकार समजत असत आणि पत्रकारात गेलो की ते मला चित्रकार समजत असत . हे आपलं एक उदाहरणार्थ वगैरे सांगितलं . पण एक मात्र निक्षून सांगेन की १९७५ – ७६ च्या सुमारास मी जेजेत प्रवेश घेतल्यापासून ते आजतागायत म्हणजे या २०२२ सालापर्यंत मी फक्त  ‘ चित्रकला ‘ या एकाच विषयाचा ध्यास घेतला आणि जगत आलो .

नाही म्हणायला जेजेत शिकताना प्रायोगिक नाट्य चळवळीत मी रमलो होतो . पण नंतर मात्र मी स्वतःला आवरलं . पण तिथं खूप मोठी  माणसं भेटली . खूप शिकायला मिळालं . नंतरच्या काळात मी जे काही थोडं बहुत काम करू शकलो  ते त्या दिवसातल्या नानाविध अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणुकीतूनच असं कबूल करावयास मला कोणताच संकोच वाटत नाही .१९७५ सालापासून मराठी , हिंदी , इंग्रजी वृत्तपत्रातल्या चित्रकलाविषयक कात्रणांचा संग्रह करणं , गेल्या १०० वर्षातील  कॅटलॉग्ज , निमंत्रण पत्रिका , कलाविषयक नियतकालिकं , पुस्तकं , ग्रंथ यांचा संग्रह करणं   जवळ जवळ मृतप्राय झालेल्या कलासंस्था पुन्हा कार्यान्वित करणे , महत्वाकांक्षी आर्टिस्ट डिरेक्ट्री प्रकाशित करणं ,कलाप्रसारासाठी  ‘ चिन्ह ‘ सारख्या कलाविषयक नियतकालिकाचं प्रकाशन करणं , ‘ गायतोंडे ‘ ‘ भास्कर कुलकर्णी ‘ यांच्यासारख्या कलंदर कलावंतांवर विशेष अंक/ ग्रंथ निर्मिती करणं , जे जे स्कूल ऑफ आर्ट , कला संचालनालय आणि अन्य कलाशिक्षण संस्था यांच्यातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणं.यु ट्यूब चॅनल सुरु करणं , गच्चीवरील गप्पांसारखे दोन दोन तासांचे कार्यक्रम सादर करणं ,  chinha art news सारखं चित्रकलाविषयक सर्वसमावेशक पोर्टल तयार करणं यासारख्या कलाविषयकच अनंत उचापत्त्या करत करतच  मी आजवर जगत आलो,या सारी उलटया पालट्या प्रवासात मी चित्रं काढली , नाही असं नाही पण या साऱ्या प्रवासात मी माझ्यातल्या चित्रकारावर निश्चितपणं अन्याय केला आहे . ती  चूक मी आता दुरुस्त करतो आहे . रोज जवळ जवळ आठ दहा तास पेंटींग करतो आहे . हे सारं चालणार आहे का तुम्हाला ? असं मी शर्मिलाला मोकळेपणानं सांगितलं म्हटलं तर तिनं  मला अगदी  थंडपणे उत्तर दिलं ‘ मला ठाऊक आहे सारं’ . या कार्यक्रमाच्या निर्मात्याशी माझं सविस्तर बोलणं देखील झालं आहे . त्यांचा फोन येईल तुला शूटची तारीख ठरवायला .
नंतर मुंबई दूरदर्शन केंद्रातून निर्माते अमितकुमार यांचा फोन आला . एक अख्खा दिवस शूटिंगला गेला . दरम्यानच्या काळात ‘ गच्चीवरील गप्पा ‘ कार्यक्रमाचे १०० भाग आटोपत आले होते . लाईव्ह कार्यक्रमात शंभर एक चित्रकारांना दोन दोन तास बोलतं ठेवणाऱ्या मला हा सारा अनुभवच नवा होता . पण मझा आला . हा मझा आता येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता आणि रविवारी दुपारी दोन वाजता  सहयाद्री वाहिनीवर  तुम्ही देखील पाहू शकाल . अवश्य पाहा  आणि तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून  कळवा !
****
– सतीश नाईक
संपादक

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.