News

कला जाणीव दोन राज्यांची

गेल्या आठवड्यात कुणीतरी व्हाट्सअप ग्रुपवर एक निमंत्रण शेअर केलं होतं. निमंत्रण होतं मध्यप्रदेश मधून आलेलं. प्रख्यात गायक उस्ताद अमीर खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदोरच्या रविंद्र नाट्यगृहात जो दोन दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचं. अतिशय कलात्मक पद्धतीनं तयार केलेलं ते निमंत्रण पाहून खरोखरच खूप समाधान वाटलं. अनेक नामवंत भारतीय  कलाकारांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. ज्यात पुण्याचे चैतन्य कुंटे आणि मुंबईच्या आरती अंकलीकर टिकेकर यांचा सहभाग होता. २३ ते २५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या समारंभात असंख्य शास्त्रीय गायकांचा समावेश करण्यात होता. उस्ताद अमीर खाँ साहेबांच्या अत्यंत सुंदर अशा छायाचित्राचा आणि मध्यप्रदेशच्या निसर्ग चित्राचा वापर करुन अतिशय सुंदर अशी ती निमंत्रण पत्रिका / माहिती पत्रक तयार करण्यात आलं होतं. ती पाहिल्यावरच असं वाटलं की, इंदोरला जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं.

त्याचवेळी कला संचालनालयाच्या राज्य कला प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका देखील कुणीतरी पाठवली. ती पाहून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या दृष्टिकोनामध्ये किती भयंकर अंतर पडलं आहे हे जाणवून गेलं. निमंत्रण पत्रिकेचं केलेलं डिझाईन हे तिसऱ्या दर्जाचं होतं. सातवळेकर, सडवेलकर यांच्या कालखंडात अतिशय सुंदर निमंत्रण पत्रिका तयार केल्या जात असतं. त्या काळात कला संचालनालयाला सरकारकडून फारसा निधी उपलब्ध होत नसे पण तरीदेखील पोस्टर, प्रमाणपत्रे, कॅटलॉग इत्यादी अतिशय सुबक पद्धतीने डिझाईन केली जात असतं .

बाबुराव सेवानिवृत्त झाले आणि कालांतराने कला संचालनालयाचं रूपांतर अवकळा संचालनालयात झालं. आज तर अक्षरशः संचालनालयाचं दिवाळं वाजलं आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी जेजेच्या शैक्षणिक आवारातच लाऊड स्पीकरवर अचकट विचकट गाणी लावून स्पोर्टडे साजरा करतात. तर प्रभारी कला संचालक आणि उप  कला संचालक दिवस न दिवस मंत्रालयात जोडे झिजवतात. त्यांना कुठं वेळ मिळणार आहे चांगलं डिझाईन करून घ्यायला. मुळात त्यांना डिझाईन म्हणजे काय हे देखील ठाऊक असेल किंवा नाही या विषयी शंकाच व्यक्त करायला हवी.

या वर्षीच्या कार्यक्रमात चित्रकार गायतोंडे पुरस्कार प्रख्यात शिल्पकार राम सुतार याना प्रदान केला गेला. पण त्या संदर्भात बातमी ना वृत्तपत्रात आली, ना एखाद्या वाहिनीवर. मध्यप्रदेश शासन जर सोशल मीडिया वापरून आपल्या कार्यक्रमांच्या जाहिराती अत्यंत प्रभावीपणे करत असेल तर कला संचालनालयाला त्याचं वावडं का बरं असावं. कुणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल का ?
******

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.