News

यांची निवड कोणी केली ?

जे जे स्कूल ऑफ आर्ट या दीडशे पेक्षा जास्त वयोमानाच्या आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जागतिक दर्जाच्या कला शिक्षण संस्थेत कोणत्या दर्जाच्या शिक्षकांची निवड केली जाते ( खरं तर आम्हाला इथं ‘ काय लायकीच्या ‘ असा चपखल शब्दप्रयोग करावयाचा होता , पण तो मोह त्या शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्यानं महत्प्रयासानं टाळला . असो ) याचा एक मासलेवाईक किस्सा नुकताच पाहावयास मिळाला . त्याचं असं झालं . शुक्रवारी १४ तारखेस कुणीतरी व्हाट्सअपवर ‘चिन्ह’ला  एक निमंत्रण पत्रिका पाठवली .

काय तर म्हणे जेजेमध्ये ‘सृजन ‘ एक चिंतन नावाचा कार्यक्रम होणार असून त्यात बहुदा महाराष्ट्राचे कलावंत कला संचालक आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता भाषण करणार आहेत वगैरे . त्या निमंत्रण पत्रिकेत वास्तविक तसा काहीच उल्लेख नसल्यानं पण  फक्त  प्रा विश्वनाथ साबळे यांचाच  फोटो ठळकपणं लावला असल्यानं , तसंच  वेळ दुपारी दोन वाजताची दिल्यानं  साबळे हेच जाहीरपणे प्रगटपणे सृजन  चिंतन करणार असा आम्ही अंदाज केला .अशा प्रकारचं प्रगट चिंतन या आधी कधीही साबळे साहेबांनी केलेलं नसल्यानं ‘ चिन्ह ‘ च्या दृष्टीनं ही मोठी पर्वणीच असल्यानं आम्ही कार्यक्रम कव्हर करण्यासाठी प्रतिनिधींची व्यवस्था करावयास  लागलों.
पण हाय रे दैवा,  नियतीला साबळेंचे विचारगर्भ शब्द ऐकण्यासाठी असलेलं आमचं आसुसलेपण मान्य नसावं . तिनं व्हाट्सअपवर आणखी एक पोस्टर पाठवून एका क्षणात आमच्या आशेच्या ,आमच्या उत्सुकतेच्या अक्षरशः चिंधड्या चिंधडया उडवून  टाकल्या . त्या पोस्टरवर लिहिलं होतं ” सृजन एक चिंतन हा आजचा नियोजित कार्यक्रम अपरिहार्य कारणासाठी पूढे  ढकलन्यात अलेला आहे . यातली एकही चूक टायपिंगची किंवा आमची नाही . विश्वास बसत नसेल तर  सोबत  लावलेलं पोस्टर बघा !
पुढचं वाक्य वाचून तर आम्हाला अक्षरशः हसूच फुटलं . काय तर म्हणे ‘ नव नियोजित  दिनांक लवकरच कळविण्यात येइल , तसदी बद्दल समक्ष्व !!! ‘ क्षमस्व हा शब्द ज्या पद्धतीनं लिहिला होता तो पाहिल्यावर हसून हसून मेलोच . आम्ही  काही अतिशयोक्ती करतोय असं वाटत असेल तर स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करुन घ्या !
अधिक चौकशी केल्यानंतर जे जे मधल्या शिक्षकांचंच हे कर्तृत्व असल्याचं कळलं . मोजून २५ शब्दांची ती कॉपी पण मराठी भाषेचे कसे धिंडवडे काढले आहेत पहा ! यावर काही लिहून भाष्य करावे एवढीही त्याची लायकी नाही . पण या वरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आणि कंत्राटी तसेच  हंगामी शिक्षकांची निवड करणाऱ्या समितीनं दिवसाच्या कोणत्या प्रहरी आणि काय काय ढोसून या असल्या दिवट्या  शिक्षकांची निवड केली असेल असा प्रश्न पडतो ! अधिक चौकशी केली असता असे कळले की हा सारा दिव्य प्रकार शिक्षण प्रशिक्षण विभागातल्या शिक्षकांनी घडवून आणला . हे ऐकल्यावर तर आम्ही चक्क किंकाळीच फोडली .
असले भयानक शिक्षक जर महाराष्ट्रातील कला शिक्षकांची पुढली पिढी घडवणार असतील तर डिनोव्होची वाट न पहाता आताच हे अभ्यासक्रम बंद करुन टाकले पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे . चंद्रकांतदादा आणि जेजे विषयी आस्था असणारे शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी आता तरी गेल्या ३०-३५ वर्षातल्या कला संचालनालयाच्या बेबंद कारभाराची सेवा निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी  करावी  ! तरच कोणे एके काळी उच्च स्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या कला शिक्षण परंपरेचं पुनरुज्जीवन होईल !
****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.